अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, गृहखात्याने पोलीस खात्यात मोठे फेरबदल केले आहेत. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.
या बदल्यांमध्ये श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांची सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी अमरावती येथील पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भावर यांची श्रीरामपूरच्या नवीन पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अधिकारी शिरीष वमने आता अहमदनगर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी नगर शहरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांची शिर्डीचे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
या बदल्यांचा परिणाम आगामी निवडणुकांवरील कायदा आणि सुव्यवस्थेच्या तयारीवर दिसून येईल, अशी चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू आहे.