बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

श्रीरामपूर : आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून, नदीपात्रात उडी घेणारा हा व्यक्ती कोण आहे, याबद्दल परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून, नदीपात्रात तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मागील तीन तासांहून अधिक वेळेपासून बचाव दल या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत असून अद्याप नदीत उडी घेणारा व्यक्ती मिळून आलेला नाही.
👉 प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा. 👈
या घटनेची माहिती मिळताच बेलापूर दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी संपत बडे आणि भारत तमनर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नदीवरील पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत ही वाहतूक सुरळीत केली. प्रवरा नदीपात्रात उडी घेणारा व्यक्ती नेमका कोण आणि त्याने उडी का मारली, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बेलापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, बचाव कार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.