पुणे प्रतिनिधी (शेख शौकत मुजावर ) : लवळे ( ता.मुळशी ) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक द्वितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडडी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,पुणे जिल्ह्याचे शिक्षणा अधिकारी संजय नाईकडे , मुळशी तालुक्याचे गट शिक्षणा अधिकारी दत्तात्रय भालेराव, लवळे गावचे सरपंच रंजित राऊत उपसरपंच किमया गावडे ,शिक्षण प्रेमी संजय सातव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश आल्हाट उपाध्यक्ष सचिन मोरे सदस्य अमोल क्षिरसागर ,महिला सदस्य सौ. उज्वला कुंभार,इंदिरा कुंभार,ज्योती पवार मुख्याध्यापक नंदा खोमणे ज्येष्ठ शिक्षक संजय मारणे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
लवळे शाळेत गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल वर्गखोल्या , संगणक लॅब,सुसज्ज वाचनालय , ग्रंथालय,प्रयोगशाळा,खगोलीय शाळा,सौरऊर्जा प्रकल्प,वॉटर फिल्टर,परसबाग,गांडुळखत प्रकल्प इत्यादी सर्व भौतिक सुविधा लोकसहभागातून सर्व शिक्षक , लवळे ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नातून साकार झाल्या आहेत.शाळेतील सर्व शिक्षक उच्चशिक्षित आणि उपक्रमशील आहेत.त्यामुळेच शाळेचा पट दुपटीने वाढला आहे.
शाळेतील सर्व शिक्षक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक आपल्या भेटीला, वैयक्तिक मार्गदर्शन, नवोदय व शिष्यवृत्ती जादा तास , उन्हाळी वर्ग शिबिर ,स्पोकन इंग्लिश क्लास इत्यादी उपक्रम शाळेत राबवले जातात.
मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. किल्ले स्पर्धेत शाळेला मुळशी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत लेझीम,भजन आणि कबड्डी स्पर्धेत प्रथम मिळवला आहे. या कार्याची दखल घेऊन शाळेला अध्यक्ष चषक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच शाळेतील शिक्षिका उज्वला नारायणकर यांना पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक प्रथम क्रमांक पुरस्कार देण्यात आला. उपक्रमशील शिक्षिका आहेत. कोडिंग,विद्यार्थी बचत बँक , विज्ञानकोडे , क्षेत्रभेटी ( पोस्ट ऑफिस , दुकान , शेती ) ,जापनीज भाषा, बोलकी अलेक्सा ,लेखक आपल्या भेटीला ,पत्रलेखन , विद्यार्थ्यांची चित्रे व लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी शाळेत राबवले आहेत. विविध नामांकित वृत्तपत्रे आणि शैक्षणिक मासिके यामध्ये लेख आणि उपक्रमांना प्रसिद्धी मिळाली आहे.त्यांच्या इंग्रजी कविता जागतिक प्रकाशनाच्या पुस्तकात प्रकाशित झाल्या आहेत. रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ एफ एम चॅनलवर त्या आरजे म्हणून काम करतात. त्यांचा संस्कार शिदोरी हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.एससीईआरटी आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत गणित विषयात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना मिळाले आहे.तसेच त्यांनी शाळेसाठी लोक सहभागातून पाण्याचे फिल्टर , स्मार्ट टीव्ही इ . वस्तु मिळाल्या आहे. शाळेच्या ऑनलाईन कामात त्यांचा हातखंडा आहे. भूगाव केंद्राचे यूट्यूब चॅनल , ब्लॉग तसेच शाळेचा ब्लॉग , शाळेचे फेसबुक आणि ट्विटर पेज इत्यादी हँडल करतात. ई बालभारती व्हर्च्यु अल क्लास तसेच राज्यस्तरीय शिकू आनंदे कार्यक्रमात सुलभक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षक व गाव एकजुटीने शाळा विकासासाठी प्रयत्नशील आहेत जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सन्मानीय कुंभार सर यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभते.