श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून वाद, आज मशाल मोर्चा.
श्रीरामपूर: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या जागेत बदल केल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षाकृती समितीने आज, १८ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी केले आहे. हा मशाल मोर्चा रेल्वे स्टेशन येथील हनुमान मंदिरापासून संध्याकाळी साडेसहा वाजता निघणार आहे. त्यानंतर तिथेच एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण मोर्चामध्ये प्रखर हिंदुत्ववादी नेते धर्मवीर मिलिंदजी एकबोटे आणि आचार्य महेशजी व्यास मार्गदर्शन करणार आहेत. १० मार्च २०२४ रोजी श्री शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन सरला पिठाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले होते. मात्र, त्यानंतर एका वर्षाच्या आत, २१ एप्रिल २०२५ रोजी नामदार विखे यांच्या हस्ते नेहरू मार्केट भाजी मंडईमध्ये पुन्हा एकदा छत्रपतींच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले. ही बाब हिंदू अस्मितेचा अपमान असून, या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि हिंदू अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी या मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रकाश चित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. या आंदोलनात सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाजाला सहभागी होण्याचे आवाहन देखील चित्ते यांनी केले आहे.