श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधील काजीबाबा रोड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळांना येणारे लाल-पिवळ्या रंगाचे व प्रचंड दुर्गंधी असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विकतचे जारचे पाणी घ्यावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे श्रीरामपूर नगरपरिषदेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून या भागातील रहिवासी या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. नळावाटे येणारे पाणी इतके गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे की, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या पाण्याला ‘मेलेल्या जनावरांचा अर्क’ असल्यासारखा वास येतो. हे दूषित पाणी प्यायल्याने अनेकांना उलट्या आणि जुलाबासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. “असे दुर्गंधीयुक्त पाणी प्यायचे तरी कसे?” असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसून जारचे पाणी खरेदी करावे लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात भर पडत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Recent Posts
- श्रीरामपुरात मध्यरात्री थरार! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या मुलाने दारूच्या नशेत उडवली रिक्षा; संगमनेर रोडवर भीषण अपघात
- गुटख्याच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक; संतोष खाडेंच्या पथकाची मोठी कारवाई.
- जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था दोन्ही ‘सोमनाथांच्या’ हाती; वाघचौरे श्रीरामपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक.
- लवळे शाळेला अध्यक्ष चषक आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान!
- श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून वाद, आज मशाल मोर्चा.