श्रीरामपूरात कोट्यवधींच्या ड्रग्ज नंतर आता लाखोंचा गांजा जप्त; शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९ किलो गांजासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्सयुव्ही ५०० गाडी आणि गांजा असा एकूण अंदाजे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईने शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून. हे दोघे गांजा विक्रीसाठी श्रीरामपूर येथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा संशयित महिंद्रा एक्सयुव्ही ५०० गाडी एम एच ०२ इ इ ६९९९ पुणतांबा बाजूकडून श्रीरामपूरकडे येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव या दोघांना ताब्यात घेतले आणि गाडीसह २०१ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपींविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एन.डी.पी.एस. ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस नाईक शरद आहिरे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, सागर बनसोडे,अमोल गायकवाड, संपत बडे, मच्छिंद्र कातखडे,अजित पटारे, सुशील होलगिर, अकबर पठाण, रवींद्र शिंदे, सचिन दुकळे, राजेश सूर्यवंशी,संभाजी थोरात आदींनी यशस्वी पणे पार पडली. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.