चौफेर कानोसा सामाजिक

श्रीरामपूर: भगतसिंग चौकातील पोलीस चौकी अतिक्रमणात; जलसंपदा विभागाची हटवण्याची नोटीस!

श्रीरामपूर – शहरातील वर्दळीच्या भगतसिंग चौकात मार्च २०२५ मध्ये उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली असून, सदर पोलीस चौकी सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भगतसिंग चौकात या पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली होती. मार्च २०२५ मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले होते. मात्र, ज्या जागेवर हे मदत केंद्र उभारण्यात आले आहे, ती जागा जलसंपदा विभागाच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता, हे बांधकाम त्यांच्या विभागाच्या जागेवर विनापरवाना असल्याचे आढळून आले. त्यामुळे, जलसंपदा विभागाने तातडीने कारवाई करत पोलीस विभागाला सदर पोलीस चौकी/मदत केंद्र सात दिवसांच्या आत काढून घेण्याबाबत रीतसर नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र आता अतिक्रमणामुळे कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. जलसंपदा विभागाच्या या नोटीसला पोलीस प्रशासन काय प्रतिसाद देते आणि येत्या सात दिवसांत ही पोलीस चौकी हटवली जाते का, याकडे श्रीरामपूर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!