श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

श्रीरामपूर – शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय गुरुवारी रात्री आला. काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या दोन चालकांना वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या अज्ञात ५ ते ६ युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरगे वस्ती परिसरातील विकास स्टील रोडवर ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. आमदार ओगले यांचे चालक आबा सातपुते आणि गणेश वांडेकर यांना परिसरातील वाळू चोरीला जात असताना त्यांनी हटकले. यावरून संतापलेल्या वाळू चोरांनी कोणतीही भीड न बाळगता दोन्ही चालकांना मारहाण केली. एकाच वेळी दोन ठिकाणी हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या निषेधार्थ आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी उद्या काँग्रेसच्या वतीने शहर पोलीस ठाण्यास घेराव घालण्यात येणार आहे. आमदारांच्या चालकांनाच भररस्त्यात मारहाण झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.