दणका! पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ॲक्शन मोडवर! जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार!
अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे! नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आता कंबर कसली असून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ते ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधी तंबाखूची विक्री, गोमांस विक्री, तसेच अवैध दारू आणि गांजा यांसारख्या मादक पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यासोबतच, अवैध वाळू आणि गौण खनिजांचा उपसा व विक्री, बेकायदेशीर हत्यारांची विक्री व बाळगणे, नियमबाह्य पेट्रोलियम पदार्थांची विक्री आणि वाहतूक यावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुगार अड्डे, बिंगो पार्लर आणि ऑनलाईन जुगारासारख्या गैरप्रकारांनाही जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिला आणि बालकांच्या अनुषंगाने होणारी अनैतिक मानवी तस्करी आणि पिटा यांसारख्या घृणास्पद धंद्यांचे १००% उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
अवैध धंद्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, जर या विशेष पथकाकडून कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई झाली, तर त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी थेट जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलीस निरीक्षकाला आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे सुरू राहता कामा नयेत. याची दक्षता प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. जर यानंतरही कोणत्याही भागात अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास, संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद होतील, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. आता या विशेष पथकांची कारवाई किती प्रभावी ठरते आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीला किती प्रमाणात लगाम लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये नक्कीच खळबळ माजली आहे, यात शंका नाही!