सामाजिक

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

श्रीरामपूर येथिल शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

श्रीरामपूर – बहुजन शिक्षण संघ संचलित श्रीरामपूर येथिल शंभुक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लोकसहभागाच्या माध्यमातून नुकतेच मोठ्या उत्साहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक व जय माताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश अलघ, आर.पी.आय.चे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांच्या शुभहस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला १२ वह्या, स्कूल बॅग, कंपास बॉक्स, रायटिंग पॅड, पेन, शिसपेन्सिल आणि पाण्याची बॉटल अशा सर्व आवश्यक वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वसतिगृहाच्या भोजन हॉल (डायनिंग हॉल) बांधकामासाठी सढळ हाताने मदत देण्याचे जाहीर केले. यामध्ये नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश (युनिफॉर्म) देण्याचे जाहीर केले, तर कृष्णा कलेक्शनचे संचालक पुरुषोत्तम झवर यांनी बांधकामासाठी लागणारे संपूर्ण स्टील (लोखंड) मोफत देण्याची घोषणा केली. यामुळे वसतिगृहाच्या विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या परिवर्तनशील स्वागतगीताने झाली. यानंतर वसतिगृह प्रमुख अशोक दिवे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी सोमय्या हायस्कूलचे चेअरमन संजय छल्लारे, नगरसेविका वैशालीताई चव्हाण, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, परिवर्तन फाउंडेशनचे सचिव मेजर कृष्णा सरदार, पत्रकार विजयाताई बारसे, संसिद्धी प्रतिष्ठानच्या सचिव राधिकाताई करवा, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव डॉ. जालिंदर घिगे आणि सामाजिक कार्यकर्ते ए.पी.बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजूभाऊ रुपटक्के, बैतुशिफा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सलिम शेख, भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष आसिफभाई पोपटिया, वंचितचे संतोष त्रिभुवन, रंभाजी कोळगे, रामदास आढाव, वसंत पवार, शाहीर भीमराव कदम, कवी आनंदा साळवे, शाहीर नरवडे, दादासाहेब बनकर, उत्तमराव शेलार, कविता दिवे, सिद्धार्थ दिवे, ह.भ.प. अरुण कुऱ्हे सर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!